महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यात आज कोरोनाने बड्यांना घेरले . मोहोळच्या आमदारांना तसेच इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतींना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य खात्याच्या सुत्रांनी सांगितले . जाचकवस्ती येथील एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाग्रस्त आढळले असून आज नव्याने १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . भवानीनगर येथील एकास, कुरवली येथील ३२ वर्षीय पुरूष , पडस्थळ येथील ६५ वर्षीय पुरुष , पिंपरी बुद्रुक येथील ६५ वर्षीय पुरुष , भिगवण येथील ४५ वर्षीय पुरुष रूग्णांस कोरोनाची लागण झाली आहे .
जाचकवस्ती येथील एक व्यवसायीक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील कुटुंबीयांपैकी २७ वर्षीय महिला , २५ वर्षीय महिला , २३ वर्षीय महिला , २५ वर्षीय महिला , २ वर्षीय चिमुकली , २ महिन्याची चिमुकली , ४५ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुष तसेच इंदापूर शहर , वरकुटे , गोखळी , लासुर्णे येथेही कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत .
तसेच आमदार यशवंत माने हे इंदापूर तालुक्यातील शेळगांवचे रहिवासी आहेत . त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व १६ वर्षीय मुलीसही कोरोनाची लागण झाली आहे . त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष ननवरे यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या पुण्यात खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत . आपली प्रकृती उत्तम असून , सर्वांनी काळजी घ्यावी व वेळीच तपासणी करावी असा सल्ला यशवंत माने यांनी दिला आहे .






















