वीजपुरवठा खंडित असताना बिबट्याची बालकावर झडप; परिसरात भीतीचे वातावरण
सातारा : सातारा जिल्ह्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जय संदीप खंडागळे (वय २) असे मृत बालकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे न्हाळेवाडीसह शिवथर, मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्हाळेवाडी येथील बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्याच्या परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे ७.१५ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. याचवेळी अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने जय याच्यावर झडप घातली आणि त्याला पाठीमागील शेताच्या दिशेने ओढत नेले.
बालकाला बिबट्याने पळवून नेल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्याजवळ बिबट्या बालकाला घेऊन बसल्याचे दिसून आले. तरुणांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. मात्र, या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला होता.
जखमी बालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने न्हाळेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून शिवथर, न्हाळेवाडी आणि मालगाव परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळातही अनेकदा गाव अंधारात राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. त्यातच सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ही घटना घडल्याने महावितरण आणि वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
राजेश पवार यांनी घेतली घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पोलिस ठाणे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. लहान मुलांना घराबाहेर किंवा परिसरात एकटे सोडू नये. शेतात जाताना नागरिकांनी शक्यतो एकट्याने जाऊ नये, समूहानेच शेताकडे जावे, असे त्यांनी सांगितले. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
































