
सातारा येथे मराठी भाषेच्या विकासाची पुढची दिशा ठरणार
सातारा दि. १३ फेब्रुवारी २०२६
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ , कोल्हापूरचे पंधरावे अधिवेशन सातारा येथे होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रफीक सूरज यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा व साहित्याच्या विकासाची पुढची दिशा ठरणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय , सातारा हे अधिवेशनाचे संयोजक आहे.
रविवार दि. १५ फेब्रुवारी व सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात सदर अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिवेशनाचे संयोजक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, अधिवेशन समन्वयक डॉ. कांचन नलवडे, सचिव प्रा. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी माहिती दिली.
प्रा. डॉ. रफीक सूरज हे गेली तीन दशके मराठी साहित्याला महत्त्वपूर्ण योगदान देत आले असून सोंग घेऊन हा पोर (२०११), चिडीचूप्प(२०२२) हे कवितासंग्रह आभाळ (१९९०), बेबस(२०१३),पायाड(२०२०) हे कथासंग्रह , रहबर(२००६) ही कादंबरी आवडनावड (२००८), महानगरीय कविताः नवे वळण, नवे परिमाण (२०२१), भारतीय साहित्याचे निर्मातेः रणजित देसाई (२०२१), भारतीय साहित्याचे निर्मातेः सखा कलाल(२०२५) हे समीक्षा ग्रंथ तसेच लघुनियतकालिकांची वर्णनात्मक सूची (२०११), दस्तक(२०१२), मुस्लीम कवींच्या कवितांचे संपादन इत्यादी संशोधनात्मक लेखन , गाठीभेटी(२०१३), अकरा साहित्यिकांच्या मुलाखती,
हाताची घडी तोंडावर बोट(२०२२), सुनीलकुमार लवटे यांच्या निवडक कवितांचे संपादन, इ. ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्श म्हणून ते काम करत आहेत. तसेच जयवंत कॉलेज, इचलकरंजी येथे मराठी विभागप्रमुख म्हणून ते दीर्घकाळ काम करत आहेत.
त्यांच्या निवडीमुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सातारा येथे होणारे अधिवेशन मराठी भाषा , साहित्य आणि संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल असा सूर सर्वत्र ऐकू येत आहे.
तरी सदर अधिवेशनास भाषाप्रेमी, साहित्यिक, संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहसमन्वयक डॉ. जयश्री बाबर व प्रा. निरंजन फरांदे यांनी केले आहे.


















