नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
फलटण दि. 31 जुलै :
वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (31 जुलै) दुपारी 2.30 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यावरून 45,771 क्युसेक तर अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक, असा एकूण 46,871 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात येत असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नीरा नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठावर जाणे टाळावे, जनावरे व शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महसूल व जलसंपदा विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.


































