१२ गुन्हे उघड, २३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा :
सातारा शहरातील एका मोबाईल व्यावसायिकाची बनावट बँक एनईएफटी (NEFT) स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या १२ तासांत अटक करत त्याच्याकडून राज्यातील विविध ठिकाणी केलेले १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून तब्बल २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा सोने, महागडे मोबाईल, टीव्ही, एसी, कार व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सातारा शहरातील पोवई नाका येथील एस.एस. मोबाईल शॉप येथून एका अनोळखी इसमाने सॅमसंग कंपनीचा फोल्ड-७ मोबाईल खरेदी केला. मोबाईलचे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून आरोपीने मोबाईल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी आदित्य विनोद गायकवाड (वय २२, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड-७ मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीने सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोवा राज्यातील मडगाव येथेही अशाच प्रकारे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील सोने, मोबाईल, टीव्ही, एसी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा एकूण २३.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष म्हणजे, गुन्ह्याची माहिती मिळताच सातारा शहर डी.बी. पथकाने जलद हालचाली करत अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आणि गुन्ह्याचा छडा लावला.
व्यावसायिकांना पोलिसांचे आवाहन
बनावट बँक NEFT स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक झाल्यास तातडीने सातारा शहर पोलीस ठाणे (फोन : ०२१६२-२३०५८०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम आणि सचिन आदमाने यांनी यशस्वीपणे पार पाडली.
































