प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सत्वशीला चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती; अविनाशदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगणेशा
कराड :
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज, मंगळवार, दि. २ जून रोजी विंग (ता. कराड) येथे सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या प्रचार शुभारंभ सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण (भाभी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संस्थापक पॅनलचे नेते अविनाशदादा मोहिते, पॅनलच्या नेत्या आणि उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते यांच्यासह सर्व उमेदवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
संस्थापक पॅनलने निवडणुकीच्या तयारीला गती दिली असून, नेते अविनाशदादा मोहिते आणि सौ. अर्चनाताई मोहिते यांनी कार्यक्षेत्रातील गावागावांत जाऊन सभासद शेतकरी, स्थानिक पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि सहकार्याची मिळालेली श्वासने यांमुळे पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत संस्थापक पॅनल आपली भूमिका आणि विकासाचा दृष्टिकोन मांडत असून, कार्यक्षेत्रात प्रचाराची चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमास कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.






























