
हरकती व सूचना मागविल्या
फलटण, प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार फलटण तालुक्यातील साखरवाडी (पिंपळवाडी) येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, फलटण यांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. प्रस्तावित कार्यालयाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत शासनाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून फलटण तालुक्यात साखरवाडी (पिंपळवाडी) येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कार्यालयाचे मुख्यालय साखरवाडी येथे राहणार असून त्याच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव,आदर्की बुद्रुक यांसह फलटण, कोळकी, बरड, आसू, राजाळे, गिरवी,वडूज, आसू, राजाळे, गिरवी आणि वाठार निंबाळकर या महसूल मंडळांचा समावेश असणार आहे.
या प्रस्तावामुळे फलटण तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांना विविध महसुली कामांसाठी तहसील कार्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. स्थानिक स्तरावरच अनेक सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाबाबत नागरिक, ग्रामपंचायती, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच संबंधित विभागांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. इच्छुकांनी आपल्या हरकती अथवा सूचना ७ जुलै २०२६ पर्यंत संबंधित कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

































