खरीप हंगामासाठी सुवर्णसंधी! अनुदानावर दर्जेदार बियाणे मिळणार; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची माहिती . राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार असून काही पिकांसाठी तब्बल १०० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळणार आहेत.राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरण, मिनी किट वाटप तसेच पिक प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सुधारित आणि गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
कोणत्या पिकांना मिळणार लाभ
या योजनेत भात, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, नाचणी, खरीप ज्वारी, भुईमूग यांसारख्या महत्त्वाच्या खरीप पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकानुसार व योजनेतील घटकानुसार अनुदानाचे प्रमाण निश्चित करण्यात आले असून काही बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
दर्जेदार बियाण्यांमुळे उत्पादनवाढीची संधी
कृषी क्षेत्रात दर्जेदार बियाणे हे भरघोस उत्पादनाचे मुख्य आधार मानले जाते. हवामान बदल, अनियमित पाऊस आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले हे अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. सुधारित व प्रमाणित बियाण्यांमुळे पिकांची उगवण क्षमता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि उत्पादनातही वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो
“प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” तत्वावर लाभ
या योजनेचा लाभ “प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” या तत्वावर दिला जाणार असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना विलंब न करता अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अनेक शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शासनाच्या या उपक्रमामुळे त्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये: अर्जदाराच्या नावावरील ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक खाते आधारशी लिंक असणे, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र , महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज कुठे करायचा
शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा.
शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना
खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जात आहे. कमी खर्चात दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्यास उत्पादन वाढीस मदत होणार असून शेती अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.“खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी ही योजना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

























