महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
दि. २१ मे रोजी अक्षतनगर कोळकी ता. फलटण येथे मुंबईस्थित आलेल्या ७४ वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील कुटुंबातील चौघा जणांचा प्रथम अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना सातारा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव आल्याने त्या चौघांना पुन्हा अक्षयनगर कोळकी ता.फलटण येथे यांच्या निवासस्थानी होम क़्वारनटाइन करण्यासाठी आणले असता अक्षतनगर मधील स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे त्या ४ रुग्णांना अक्षतनगर येथील रिक्षा स्टॉप वरच्या स्टॅंडवर बराच वेळ तिष्ठत बसावे लागले. मृत व्यक्तीची पत्नी, सून आणि दोन नातू असा चौघांचा त्यात समावेश होता.
दि. १८ मे रोजी मुंबईवरून कोळकी येथील अक्षतनगर मध्ये आलेल्या व्यक्तीचा येथे आल्यानंतर चार तासाच्या आतच हृदय विकाराने १८ मे रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे निकट संपर्कातील चौघेजण आणि इतर आठ जण असे बारा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत; पण अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या चौघा जणांना अक्षतनगर मध्ये प्रवेश देण्यास स्थानिकांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलीस खात्याने मध्यस्थी करत त्यांना त्यांच्या निवासस्थानी सोडले आहे. त्यांना त्याठिकाणी आणखी पाच दिवस होम क़्वारनटाइन करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण उपनिरीक्षक बनकर त्यांचे सहकारी व ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी नागरिकांची ची समजूत घालत प्रकरण शांततेने हाताळले.
प्रत्यक्षात या व्यक्ती येथील रहिवासी नाहीत; परंतु त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे १४ दिवस अक्षतनगर आणि परिसर सील करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. थोड्याशा अकारण झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यातही असे समजते की , ज्या कुटुंबाकडे हे मुंबईवरून त्यांचे नातेवाईक आले होते त्या कुटुंबातील व्यक्तींचे शेजारीपाजारी सलोख्याचे संबंध नसल्याने लोकांनी त्याला विरोध केला होता.