नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (2 सप्टेंबर 2024) महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या वारणानगर येथे वारणा महिला सहकारी उद्योग समुहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न झाला.
समाजातील अंगभूत शक्तीचा योग्य वापर करण्यासाठी सहकार्य हे सर्वोत्तम माध्यम आहे. सहकाराची तत्त्वे संविधानात मांडलेल्या न्याय, एकता आणि बंधुत्वाच्या भावनेचे पालन करतात. जेव्हा विविध वर्ग आणि विचारसरणीचे लोक सहकार्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांना सामाजिक वैविध्याचा लाभ मिळतो. देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमूल आणि लिज्जत पापड सारखे घरगुती ब्रँड ही अशा सहकारी संस्थांची उदाहरणे आहेत असे राष्ट्रपतींनी यावेळी उद्धृत केले.
आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, या यशात सहकारी समूहांचे मोठे योगदान आहे. जवळजवळ सर्व राज्यांमध्ये, सहकारी संस्था प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि वितरण करतात. केवळ दूधच नव्हे तर खते, कापूस, हातमाग, गृहनिर्माण, खाद्यतेल, साखर यासारख्या क्षेत्रात सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
सहकारी संस्थांनी दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र या झपाट्याने बदलणाऱ्या काळात त्यांनी स्वतःला बदलण्याची गरज आहे असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
त्यांनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि व्यवस्थापनाला अधिक व्यावसायिक बनवावे. अनेक सहकारी संस्थांना भांडवल आणि संसाधनांचा अभाव, प्रशासन आणि व्यवस्थापनाचा अभाव तसेच सहभाग कमतरता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांना सहकार क्षेत्राशी जोडणे या दिशेने महत्त्वाचे ठरू शकते, असे त्या म्हणाल्या. प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश करून तरुण त्या संस्थांचा कायापालट करू शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. सहकारी संस्थांनी सेंद्रिय शेती, साठवण क्षमता वाढवणे आणि पर्यावरण पर्यटन यांसारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्याचा सल्ला राष्ट्रपतीनी दिला.
कोणत्याही उद्योगाच्या यशाचे खरे गमक सामान्य लोकांशी त्याचे असलेल्या नात्यात दडलेले आहे, असे त्या म्हणाल्या. त्यामुळेच सहकारी संस्थांच्या यशासाठी लोकशाही व्यवस्था आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचे हित सर्वोपरि असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोणतीही सहकारी संस्था कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि नफा कमविण्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा मुळ उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सहकारात कोणाची मक्तेदारी न राहता खरे सहकार्य असायला हवे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे, नवीन तंत्रज्ञान शिकावे, दैनंदिन जीवनात पर्यावरण संवर्धनाला महत्त्व द्यावे, गरजूंना मदत करावी आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांमुळे भारत जागतिक स्तरावर उच्च स्थानावर पोहोचेल, असे त्या म्हणाल्या.