पुणे, 30 जुलै 2024
केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील सैनिकांसह कन्नूरमधील लष्करी रुग्णालयाचे वैद्यकीय मदत पथक आणि कोझिकोडमधील प्रादेशिक लष्कराचे सैनिक याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
आज सकाळी वायनाड जिल्ह्यातील मेप्पडी येथील पहाडी भागात मोठे भूस्खलन झाले. बचावकार्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाकडून सहाय्य घेतले जात आहे. सुलूर एअरफोर्स स्टेशन इथून दोन हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. तसेच कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्रातून दोन पथके, आवश्यक बचाव साहित्य आणि इतर तुकड्या मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र : जिल्हा सांगली
सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या 20 किलोमीटरच्या पट्टय़ात झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यात आले असून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DMA), पोलीस अधीक्षक आणि सांगली महानगरपालिका आयुक्त यांचा समावेश असलेले पथक सध्या मदतकार्य करत आहे. जिल्हा प्रशासनाने सुटका केलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक वैद्यकीय शिबीर देखील उभारले आहे.
महाराष्ट्र : पालघर, ठाणे (वर्सोवा पूल).
या ठिकाणी 14 जून 2024 पासून अभियंता कृती दलाचे पथक तैनात आहे.
कर्नाटक: अंकोला भूस्खलन.
अंकोला येथे भारतीय लष्कराचे पथक, भारतीय नौदलाचे चालक आणि अभियंता कृती दलाचे पथक 21 जुलै 2024 पासून बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले होते. नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार हे पथक आज परत येणार आहे.
**