बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गुलाबराव शिंदे यांचे बुधवार दि १० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.
पुणे जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले शहाजी शिंदे हे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. संघटनेच्या कामासाठी कोणताही बडेजाव न करता दुचाकीवरुन प्रवास करत त्यांनी साधेपणा जपला होता. साप्ताहिक राळेगणसिद्धीच्या माध्यमातून माहिती अधिकार आणि भ्रष्टाचार निर्मुलनासाठी महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
नंतरच्या काळात साप्ताहिक शारदारत्न, साप्ताहिक ज्ञानरेष, साप्ताहिक सोमेश्वर प्राईड आदी साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करताना त्यांनी विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्वत:चा मेडीकल व्यवसाय बंद करुन समाजसेवेत झोकून देणाऱ्या शहाजी शिंदे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने वाणेवाडी सह सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.