पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात सांगली येथे एक दिवसीय माध्यम कार्यशाळेचे आयोजन
सांगली, 20 ऑगस्ट 2024
जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो असे पत्र सूचना कार्यालय पुणे चे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले. पी आय बी च्या मुंबई कार्यालयाच्यावतीने सांगली येथे आयोजित केलेल्या ‘वार्तालाप’ या माध्यम कार्यशाळेत ते आज बोलत होते.

समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचे वाढते प्रमाण बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्वपूर्ण झाली आहे, असे महेश अय्यंगार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. “फेक अर्थात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि खोट्या बातम्या उघडकीस आणण्यात, तथ्य समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार असू शकते” असे ते म्हणाले. खोट्या आणि तथ्यहीन बातम्यांपासून जनसामान्यांचे रक्षण करण्यासाठी दक्षतेला अनन्यसाधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
खाद्यान्नविषयक तंत्रज्ञान, कीटक व्यवस्थापन अशा क्षेत्रात कार्यरतसंशोधन संस्था आणि पत्रकार यांच्यात संवाद साधण्यासाठी वार्तालाप यासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले.




































