महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकीस शेख (लोणंद )
कमिन्स कंपनीतील प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून हा खूप वर्षापासूनचा फलटण तालुक्यातील धगधगता प्रश्न आहे. सुरवडी ता.फलटण येथील कमिन्स कंपनीची 2005 दरम्यान निर्मिती झाली असून त्यासाठी फलटण तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी कवडीमोल किंमतीत आपल्या अनमोल जमिनी मोठ्या प्रमाणावर दिलेल्या आहेत. त्यावेळी सदर शेतकरी पुत्रांना कमिन्स कंपनीमध्ये नोकरीवर कायमस्वरूपी करुन चांगल्या प्रकारे वेतन देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र कमिन्स कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, तर काही जणांना कमी करणार आहेत व काही जणांना दहा वर्षे सेवा देऊनही कंत्राट पद्धतीने त्यांचेकडुन काम करून घेण्यात येत आहे. या भूमिपुत्र कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर नियुक्त करून घेण्याचे टाळून कमिन्स कंपनी त्यांच्यावर अन्याय करत असून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सदर निवेदनाबद्दल कंपनीला लेखी पत्राद्वारे कळवले असता प्रकल्पग्रस्त, स्थानिक भुमिपुत्र व एमआयडीसी बघुन घेतील. त्यांचा आमच्या कंपनीशी काही संबंध नाही असे उत्तर कंपनीच्यावतीने देण्यात आले असल्याचे फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय नाही मिळाला तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशारा शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांच्या वतीने देण्यात आला आहे. फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, फलटण शहर प्रमुख रणजित कदम, दत्तात्रय मदने, आसिफ शेख, प्रसाद जगताप, अभिजीत जगताप, शेखर गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.






















