- चाफळ, दि. 1 ( वार्ताहर) : चाफळ विभागातील शिंगणवाडी गावच्या परिसरात असणाऱ्या खडिचा मारुती मंदिराजवळ मल्हारपेठ, ता. पाटण येथील एका २२ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली.
सत्यजित आनंदराव पवार (वय २२) रा. मल्हारपेठ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिंगणवाडी गावच्या परिसरात असणाऱ्या मारुती मंदिरापासून काही अंतरावर एक अनोळखी युवक झोपला असल्याचे या परिसरात जनावरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी जवळ जावून पाहिले असता त्या तरुणाजवळ विषारी औषधाची बाटली व प्लास्टिकचे रिकामे ग्लास पडल्याचे दिसले. प्रसंगवधान राखत या गुराख्यांनी चाफळ पोलिसांना ही माहिती कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर युवकाजवळ मल्हारपेठ येथील जमिनीचा ७/१२, खातेउतारा आढळून आला. यावरुन पोलिसांनी मल्हारपेठ येथील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यावरुन हा मृतदेह सत्यजित आनंदराव पवार याचाच असल्याचे स्पष्ट झाले. सत्यजित हा माळकरी तरुण असून तो मल्हारपेठ येथे आई, वडील, बहिण व आजी सोबत राहतो. काही दिवसांपासून तो मल्हारपेठ परिसरातच मित्राच्या मदतीने बिस्किट विक्रिचा व्यवसाय भागिदारीमध्ये करत असल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना सांगीतले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चाफळ पोलिस दुरक्षेत्रामध्ये नोंद झाली आहे. सदरचा युवक इंडिका गाडी क्रमांक एम. एच. 08 सी 7289 या गाडीने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मारुती मंदिर परिसरात आला असल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.