उंब्रज-प्रतिनिधी :
( सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखालील उंब्रज पोलीस टीमची कारवाई)
उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस टीमच्या सतर्क नाकाबंदीमुळे उत्तम बाबुराव सूर्यवंशी वय -५६ राहणार भोळेवाडी,ता.कराड हा मोटरसायकल तसेच बंब चोरटा जेर बंद करण्यास उंब्रज पोलिसांना यश आले आहे. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख सो यांनी रंगपंचमीच्या अनुषंगाने नाकाबंदी करून चोरीस गेलेली वाहने शोधून आरोपींना अटक करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीत सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,अंमलदार व होमगार्ड हे सक्रिय सहभागी झाले होते. दरम्यान, दिनांक १२/०३/२०२३ रोजी पाटण तिकाटणे येथे नाकाबंदी करीत असताना एक संशयित इसम मोटरसायकल वरून पाठीमागे काहीतरी बांधून घेऊन जात असताना सपोनि अजय गोरड यांच्या निदर्शनास आले. वेळेचे गांभीर्य तसेच प्रसंगावधान ओळखून सपोनी अजय गोरड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांस त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी सदर इसमाचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यास उंब्रज चरेगाव रोडवरील हिंदुस्तान पेट्रोल पंपा समोर पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने मोटरसायकल तेथेच टाकून ऊसात पळून जाण्याचा प्रयत्न करताना जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक एम. एच-११ सी.डी.८०९ व तीन बंब असा एकूण ४९५००/- रुपयांचा मुद्देमाल उंब्रज पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान,या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील,पोलीस हवालदार विष्णू मर्ढेकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर माने, होमगार्ड रविराज जंगम, अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलीस हवालदार अमृत आळंदे करीत आहेत.