खा. श्रीनिवास पाटील यांचा पाठपुरावा; वन्यप्राण्यांची सुरक्षितता वाढणार
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड
विविध घटनात जखमी झालेल्या, अनाथ तसेच तणावग्रस्त वन्यजीवांवर तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कराड तालुक्यातील वराडे येथे प्राथमिक उपचार केंद्रास मंजुरी मिळाली आहे. या केंद्रासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना तात्काळ उपचार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सातारा जिल्ह्याला विपुल नैसर्गिक संपदा लाभलेली आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. तर वन्यजीव हे त्यातील महत्वाचा घटक असल्याने त्यांच्यादेखील आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात बिबट्या, वानर, माकड, कोल्हा, लांडगा, ससा, रानगवे, मगर, मोर, तरस, कासव, रानडुक्कर, घोरपड, साळींदर, घुबड आदी अनेक वन्यप्राणी आढळतात. तसेच विविध सरपटणारे प्राणी व वन्य पक्षीही आढळून येतात. याशिवाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कार्यक्षेत्र देखील येते. दिवसेंदिवस वन क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. रस्ता ओलांडताना गाडीची धडक बसल्यामुळे, चुकून वस्तीत आल्यामुळे, माणसाबरोबर झालेल्या संघर्षामुळे किंवा विविध प्रकारच्या घटनांत वन्यप्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अशा जखमी वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी असे केंद्र उपयुक्त ठरते.

या केंद्रात प्राथमिक उपचार करून प्रांण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र असे केंद्र सातारा जिल्ह्यात नसल्याने जखमी वन्यजीवाला पुण्यातील कात्रज येथील राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाते. दरम्यान या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने काही वेळेस उपचारापूर्वीच त्या मुक्या प्राण्याला जीवास मुकावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यात एक वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु करावे अशी मागणी वन्यप्रेमी रोहन भाटे व नाना खामकर यांनी खा.श्रीनिवास पाटील यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन खा. पाटील यांनी नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून कराड तालुक्यातील वराडे याठिकाणी हे उपचार केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तसा आदेश कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी पारित केला आहे.

कराड हे चांदोली, सागरेश्वर व कोयना या तिन्ही अभयारण्यासाठी मध्यभागी ठिकाण असल्या कारणाने वराडे येथील वनखात्याच्या जमिनीची निवड करण्यात आली आहे. खा. पाटील यांच्या प्रयत्नातून अखेर जिल्ह्यात वन्यजीव उपचार केंद्र सुरू होणार असल्यामुळे वन्यजीवांची सुरक्षितता जपली जाणार आहे. यामुळे आता पूर्णवेळ एक पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असून त्यामुळे बिबट्या किंवा अन्य हिंस्र प्राणी मनुष्यवस्तीत शिरल्यावर त्याला सुखरूप पकडण्यासाठी भुलीचे औषध देणारी बंदूक वापरता येणे शक्य होणार आहे. हे केंद्र मंजूर झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील वन्यप्रांण्यांची सोय होणार आहे. या केंद्रामुळे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याने निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.






















