महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर ) : शहाजीराजे भोसले
प्रसिध्द भागवताचार्य , कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत , स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त वा. ना. उत्पात (वय 80) यांचे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . उत्पात यांना 13 सप्टेंबर रोजी काहीसा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने 14 सप्टेंबर रोजी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .
उपचार सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली . आज दुपारी त्यांचे निधन झाले . वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांनी कवठेकर आणि द. ह. कवठेकर प्रशालेत शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले . कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली . ते कट्टर सावरकर भक्त म्हणून ओळखले जात असत . स्व. अनंतराव आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांचा त्यांना अनेक वर्षे सहवास लाभला . स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची त्यांनी स्थापना केली .
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली . त्या व्याख्यानाच्या मानधनातून त्यांनी सावरकर वाचनालयाच्या जागेवर सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन सावरकर क्रांती मंदिराची उभारणी केली आहे . त्याच ठिकाणी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अभ्यासिका सुरु केली आहे. समस्त उत्पात समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले . त्यांची वक्तृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती . त्यांनी आपल्या अमोघ आणि सडेतोड भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या . निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुण होता . सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचे वाचन आणि लेखन शेवटपर्यत सुरु होते . पंढरपुरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे . पंढरपुरातील अनेक महत्वाच्या सामाजिक घटनांचे ते साक्षीदार होते . प्रहार नावाने त्यांनी अनेक वर्षे साप्ताहिक चालवले . अभिजात शास्त्रीय गायनाचा प्रसार करणाऱ्या स्वरसाधना या संस्थेची त्यांनी स्थापना केली .
उत्पातांच्या लावणीला त्यांच्या निवेदनाची अमोघ जोड होती . सुमारे पस्तीस वर्षे त्यांनी येथील श्री रुक्मीणी मंदिरात भागवत कथा तर संत गजानन महाराज मंदिरात तब्बल पंचवीस वर्षे ज्ञानेश्वरी सांगितली . अनेक विषयांवर त्यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत . सामाजिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते . अनेक विषयांवरचा त्यांचा व्यासंग होता . अल्पशा आजाराने झालेल्या त्यांच्या निधनामुळे पंढरपूरच्या सामाजिक , शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे . (कै.) उत्पात यांच्या पश्चात मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात , चार मुली , सून , नातवंडे असा परिवार आहे .