लोणंद, दि.०७/ प्रतिनिधी
लोणंदकरांची गेल्या कित्येक वर्षांपासून गंभीर समस्या होत चाललेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरुपी उपाय म्हणून आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून साकार होणार असलेल्या सुमारे ६२ कोटींहून अधिक खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
लोणंद याठिकाणी हेलिकॉप्टर मधून आगमन झाल्यानंतर अजित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर लोणंद नगरपंचायत चौकात अजित पवार यांचे लोणंद राष्ट्रवादीकडून क्रेन द्वारे पुष्पहार घालून तसेच जेसीबीतून फुलांची उधळत करत जंगी स्वागत करण्यात आले.
लोणंद शहरात सद्ध्या साठ वर्ष जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या वाढते औद्योगिकीकरण आणि त्यातून वाढणाऱ्या शहरीकरणामुळे लोणंद मधील जनतेला नियमित पाणी पुरवठा करताना अडचणी येत होत्या. पालखी काळात तसेच ऊन्हाळ्यात बऱ्याचदा टॅंकर द्वारे पाणी पोहचवण्याचे काम नगरपंचायतीकडून केले जात होते. या समस्येवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीर जलाशयातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत भविष्यातील लोणंद शहराची २०५५ पर्यंतची वस्तुस्थिती विचारात घेऊन ६२ कोटी ४३ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. मकरंद पाटील, नितीन भरगुडे पाटील , बाजार समिती सभापती सुनील शेळके, दयानंद खरात यांच्या उपस्थितीत लोणंद येथील जुनी पाणीपुरवठा टाकी याठिकाणी सदर कामाचे भूमिपूजन केले.
यावेळेस सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार अजित पाटील, लोणंदच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, बांधकाम सभापती भरत शेळके, पाणीपुरवठा सभापती रशिदा इनामदार, नगरसेवक शिवाजीराव शेळके , मधुमती गालिंदे, सचिन शेळके, सुप्रिया शेळके, भरत बोडरे, गणीभाई कच्छी, दीपाली निलेश शेळके, सागर शेळके, नगरपंचायत मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरअभियंता सागर मोटे , शंकरराव क्षीरसागर, बबनराव शेळके, दादासो शेळके, एडव्होकेट गजेंद्र मुसळे, एडव्होकेट गणेश शेळके, असगर इनामदार, हणमंत शेळके, बंटी खरात, सागर गालिंदे आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळेस लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.