महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले( कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने एटीएम सेंटरचे शटर तोडून एटीएम मधील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला .
बेलवाडी गावामध्ये रात्रीच्या २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने एटीएम सेंटरचे शटर कापून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू होता . यावेळी अचानक वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार , पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप , पोलीस हवालदार सुरेश राक्षे , जगन्नाथ कळसाईत , सचिन गायकवाड , विजय शेंडकर रात्रीची गस्त घालत असताना एटीएम तपासणी करण्यासाठी गेले होते .
पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत गॅसकटर व सिलिंडर जाग्यावर सोडून पळ काढला . पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे सापडले नाहीत . यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की , पोलीस ठाण्याचे माध्यमांतून रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व एटीएम , बॅंका , सराफी दुकाने , पेट्रोल पंप यांची नियमित तपासणी सुरू असते. चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे स्थानिक असण्याची शक्यता असून , लवकरच तपास लागेल .