वाई/प्रतिनिधी
क्रांतिवीर किसन वीर आबांचे नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्या आमदारांना तीन टर्म आमदारकी भोगून सुद्धा स्मारक परिसर अद्याप सुशोभित करता आला नाही ही किती मोठी शोकांतिका आहे. स्व. आबांच्या स्मारकाच्या दुरावस्थेबाबत एखाद्या दैनिकात वृत्त छापून आले की…. एवढ्या कोटीचा निधी मंजूर झालाय आणि तेवढ्या कोटीचा निधी आलाय अशा बतावण्या करत किरकोळ इकडे तिकडे रंगरंगोटी करायची आणि जनतेचा रोष शांत करायचा
एवढाच काय तो खटाटोप जनता १५ वर्षे झाले पहातेय. सत्तेचे केंद्रीकरण करून सर्वसत्ता घरातच यशवंत विचाराला तिलांजली देण्याचा पराक्रम वाईच्या आमदारांनी केला असून यापुढे आता क्रांतिवीर आबासाहेब वीर यांच्या विचाराचा तालुका घडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचारादरम्यान केले.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आज वाई पूर्व भागात जोरदार जनजावती प्रचार दौरा सुरू केला सुरूर, कवठे, आणवडी, चिखली, बेलमाची यासह पूर्व भागातील सर्व गावांना भेटी दिल्या.
पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेऊन संवाद साधला वाई विधानसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश असून आता मतदानातूनच जनता आपला राग व्यक्त करेल असा विश्वास देखील पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला.
वाई तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद
अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना वाई तालुक्यातील प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून विद्यमान आमदारांच्या स्वार्थी आणि मनमानी कारभारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास पुरुषोत्तम जाधव व्यक्त केला.