दैनिक महाराष्ट्र न्यूज. दि ३०
साखरवाडी ता फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असून आज दिनांक ३० रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७५ रुपये प्रति टनाप्रमाणे दुसरा हप्ता वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली अजितराव जगताप म्हणाले, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती यावर विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कंपनीच्या चेअरमन प्रीती रूपारेल व संचालक जितेंद्र धारू यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार शेतकऱ्यांना ७५ रुपये प्रति टन या प्रमाणे दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आज दि ३० रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली आहे
श्री दत्त इंडिया कारखान्याने मागील चार गळीत हंगामामध्ये अचूक वजन काटा व चोख पेमेंटमुळे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून या जोरावर कारखान्याने गत हंगामामध्ये एकूण ८ लाख ६२ हजार ९५२ मेट्रिकमीटर उसाचे गाळप करून याचे ३ हजार १०० रुपये प्रमाणे २३७ कोटी ५१ लाख ५१ हजार एवढी रक्कम दर पंधरा दिवसांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे दिवाळीला कारखान्यातील तब्बल ९०० कामगारांना २० टक्के एकरकमी ६ कोटी ४९ लाख बोनस व प्रत्येकी दहा किलो साखर मोफत दिली असून शेतकऱ्यांना गळीतास आलेल्या ऊसाला प्रति टन १ किलो प्रमाणे वीस रुपये दराने साखर वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले मागील काही दिवसांपूर्वी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी श्री दत्त इंडियाने दुसरा हप्ता द्यावा म्हणून मागणी केली होती वास्तविक श्रीदत्त इंडिया कारखाना हा उसाची एफ आर पी ची रक्कम एक रकमी एकाच वेळी देत असल्याची आमची परंपरा आहे मात्र तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊ आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७५ रुपये प्रमाणे रक्कम वर्ग केली असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील चार हंगामाप्रमाणेच श्रीदत्त इंडिया साखर कारखान्यावर विश्वास दाखवून आगामी गळीत हंगामामध्ये आपला ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन त्यांनी केले