महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /खंडाळा -धनगरवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत सुरतहून लग्नापुर्वीच्या फोटो शूटिंगसाठी महाबळेश्वर ,पाचगणी याठिकणी कारमधून निघालेल्या कारचा टायर फुटून कार तब्बल पाच ते सहा वेळा महामार्गावर पलटी होत झालेल्या अपघातामध्ये छायाचित्रकार हा गंभीर जखमी झाला असून तर कारमधील ५ जण जखमी झाले. याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, गुजरात राज्यातील सुरत येथील वस्तल राजेश भोगावला (वय २६) हा आपली होणाऱ्या पत्नी ख़ुशी परेशभाई चपेटवाला (वय २०),जय विनयभाई झवेरी (वय २७),हेतल परेशभाई चपेटवाला (वय ३८), छायाचित्रकार हर्ष भारतभाई शहा (वय २८), प्रतीक प्रेमजीभाई मनिया (वय २९) यांच्यासमवेत कार क्र.(जीजे-०५-आरसी-९४३८) ने लग्नापुर्वीच्या व्हिडीओ शूटिंग व फोटोग्राफ़ी करण्याकरिता महाबळेश्वर ,पाचगणी याठिकाणी निघाले होते. दरम्यान , कार धनगरवाडी हद्दीमधील मोठे वस्तीजवळ आली असता अचानकपणे कारचा तयार फुटल्याने चालक वस्तल भोगावला याचे कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गावर तब्बल पाच ते सहा वेळा पलटी होत महामार्गवर पुन्हा उभी राहिली. यावेळी अपघाताची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे,जयवंत घोरपडे यांनी घटनास्थळावर धाव घेत नागरिकांच्या मदतीने अपघातामधील गंभीर जखमी झालेल्या हर्ष शहा यांच्यासह कारमधील जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता हर्ष शहा याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला अधिक उपचाराकरिता पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
या घटनेची फिर्याद वस्तल भोगावला याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मदन वरखडे,जयवनात घोरपडे हे करीत आहे.




















