कराड : कराड शहरात लावलेल्या हार्दिक अभिनंदन फलक संदर्भात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी झाल्यानंतर उमेश आनंदराव शिंदे यांनी कराड शहरातील विविध भागात हार्दिक अभिनंदनांचे फलक लावले होते. हे फलक लावताना कराड नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान याबाबत कराड नगरपरिषद प्रशासनाने उमेश शिंदे यांना नोटीस बजावून याबाबत खुलासा मागितला होता. अखेर सोमवार दिनांक 12 जुलै रोजी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
कराड शहरात वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड, शुभेच्छा फलक लावणेस जनरल कमेटी ठराव क्रमांक 11/264 दिनांक 17/01/2019 अन्वये बंदी घालण्यात आलेली आहे. उमेश शिंदे (अध्यक्ष अतुल भोसले युवा प्रतिष्ठान) यांनी फ्लेक्स बोर्ड अनाधिकृतपणे व विनापरवाना लावल्याने त्यांना पाच जुलै रोजी नोटीस दिली आहे. आजअखेर त्याबद्दल काही खुलासा दिलेला नाही. सदरचे कृत्य हे सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.