महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील वडूज येथील सिद्धेश्वर कुरोली फाटा येथे आज दि. 22 ( सोमवार ) रोजी पहाटे दीड च्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंधच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे व त्यांच्या टीमने कारवाई केली. यामध्ये एक डंपर, तीन ब्रास वाळू असा एकूण पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमालासह चालक योगेश ज्ञानदेव घोरपडे (वय 27 वर्षे रा. तासगाव ता. कोरेगाव) याला ताब्यात घेऊन वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, औंध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोना एम ए पुजारी व होमगार्ड पी बी यादव हे रात्र गस्त घालत होते. वडूज पोलीस ठाण्याला भेट देऊन परत जात असताना सिद्धेश्वर कुरोली फाटा येथे म्हसवडकडून एक वाळूने भरलेला डंपर भरधाव वेगाने येत असताना दिसताच सदर टीमने तो डंपर थांबवला. चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना बाबत विचारणा केली असता चालकाने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर वाळूचा डंपर म्हसवड वरून आणला असून तो कराडला घेऊन चाललो आहे असेही सदर चालकाने सांगितले. यावरून तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सोमदे यांनी डंपर क्र एम एच 10 ए डब्लू 2388 तीन ब्रास वाळुसह जप्त करून वडूज पोलीस ठाण्यात आणून जमा केला व चालकावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो ना शिवाजी खाडे करीत आहेत.





















