पाटण, दि. 10 : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पश्चिमेकडे समुद्राला जाणारे पाणी मुंबईकडे पिण्यासाठी वळवले तर काय हरकत आहे . यात कसले ही राजकारण नसून त्याला कोणीही राजकीय वळण देऊ नये. कोयना प्रकल्प आणि पर्यटनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतचा आराखडा लवकरच तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोयनेचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पाहणी करता कोयनानगर ते आले होते . याबाबत कोयनानगर येथील चेंबरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ना. पाटील बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोपळी येथील कोयना विद्युत ग्रह टप्पा क्रमांक 4 ची व कोयना धरण प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर ते पुणे येथील एक्सप्रेस हायवेच्या टनेलच्या कामाची पाहणी करण्यासाठी तातडीने रवाना झाले.
ना. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, राज्यात आघाडीचे शासन सत्तेत आल्यावर राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची पाहणी करून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय झाले होते. मात्र राज्यात गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकत्रित येता येत नव्हते .त्यामुळे अनेक प्रकल्पांना भेटी देता आल्या नाहीत . आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची माहिती घेऊन ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले की , 1964 सालापासून कोयना जलविद्युत प्रकल्पाची यंत्रसामुग्री जुनी आहे. त्यात आमूलाग्र बदल करून सध्याची सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता पुढे अधिक वाढवता येईल का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. त्याचबरोबर प्रकल्पाच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. काही प्रकल्प निधीअभावी बंद असल्याने त्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत ही चर्चा झाली. कोयना पर्यटनाबाबत ही मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली असून कोयनेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याचबरोबर अधिवेशन संपल्यानंतर याबाबत लवकरच बैठक घेऊन त्याबाबतीत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील. अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास ना. देसाईनी शेवटी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.