महारास्ट्र न्यूज प्रतिनिधी :प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
फलटण तालुक्यात मेंढपाळ व्यावसायिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागात धनगर समाजातील लोक शेळी-मेंढी पालन व्यवसाय करीत आहेत. या भागात डोंगर दरी प्रदेश असल्याने तसेच त्या ठिकाणी जून- जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने या परिसरात शेळी-मेंढी यांना लागणारा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील छोटे छोटे मेंढपाळ व्यावसायिक 100 ते 200 मेंढयाच्या कळपाने या डोंगर भागात मेंढरं चरण्यासाठी नेतात.
फेब्रुवारीच्या मध्यावती नंतर ते मे महिन्या अखेर दुस्काळ स्थिती असल्याने पिण्याचे पाणी व चारा यांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती, त्या मुळे मेंढपाळ व्यावसायिक चिंताग्रस्त झाला होता. त्यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीने मेंढपाळ व्यावसायावर आधारित असणारे इतर व्यवसायही बंद पडले. त्यामुळे मेंढपाळ व्यवसाय प्रचंड आर्थिक संकटात सापडला होता. या झालेल्या पावसामुळे चारा उपलब्ध झाल्याने शेळ्या मेंढयांची उपासमार थांबली आहे. तसेच या भागात चारा उपलब्ध झाल्याने सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापुर या दुष्काळग्रस्त तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी या दुष्काळग्रस्त भागातून या फलटण तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात शेळ्या मेंढयांच्या कळपा-कळपाने चारा शोधत या दक्षिण भागात मेंढपाळ व्यवसायिक येवू लागले आहेत.
मटण व्यवसायिक व लोकर व्यवसायिकांचे व्यवसाय सुरू झाल्याने या शेळी-मेंढी व्यवसायास चालना मिळाली आहे. मेंढयां पासून मिळणारे मटण, लोकर तसेच खत या मुळे या मेंढपाळ व्यवसायिकांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाला आहे.धनगर समाजातील हे मेंढपाळ व्यवसायिक वर्षानुवर्ष भटकंती करीत रहातात. मेंढयांच्या लोकरी पासून घोंगडी, जान, रग व उबदार वस्त्रे बनवली जातात. त्यामुळे प्राचीन काळा पासून या मेंढपाळ व्यावसायाला ऐतिहासिक महत्व आहे.राज्यात संचारबंदी, आपत्य व्यवस्थापन कायदा व जिल्हाबंदी लागू असल्याने मेंढपाळ व्यवसायिकांना शेळ्या मेंढया व कुटुंबासह स्थलांतरीत होण्यास कायद्याची अडचण ठरत आहे. या कायद्यातून या व्यवसायिकांना सवलत मिळावी, अशी मागणी मेंढपाळ व्यवसायिक करीत आहेत.