सध्याच्या आव्हानात्मक आर्थिक वातावरणाला समर्थपणे तोंड देण्यासाठी बँकांनी जोखीम टाळण्याची टोकाची प्रवृत्ती सोडून आपले अधिक लक्ष जोखीम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण निर्णयावर केंद्रित करावे, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना दिला.
‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने अनलॉक बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड इंडस्ट्रीज (बीएफएसआय 2.0) या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. जोखीम घेण्यापासून अतिदूर राहणे म्हणजे स्वत:चे लसीकरण करून घेऊन स्वत: सुरक्षित राहण्यासारखे आहे. तथापि, या बदलत्या वातावरणात ते स्वत:लाच पराभूत करून घेण्यासारखे आत्मघातकी आहे, असेही मत त्यांनी नोंदविले. ते म्हणाले की, बँका सतत जोखीम टाळत राहिल्या, तर त्यांना उत्पन्न मिळणार नाही. बँका चालवण्यासाठी त्यांना काही उत्पन्न मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी आता आपला कारभार कार्यक्षमतेने चालविण्यावर, जोखीम व्यवस्थापनावर आणि गुणवत्तापूर्ण निर्णय घेण्यावर भर द्यावा आणि प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देण्यासाठी आपली लवचिकता वाढवावी.
सध्याच्या कोरोना संकटामुळे बँकांच्या ताळेबंदावर मोठा ताण आल्याचे निदर्शनास आणून देताना ते म्हणाले, यातून त्यांचे भांडवल रोडावण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन बँकांनी तातडीने भांडवल उभारणीच्या कामाला लागले पाहिजे. अशा तऱ्हेने बफर्स निर्माण केल्याने संकटाला सामोरे जाण्याची त्यांची आणि वित्तीय क्षेत्राची ताकद वाढेल. रिझर्व्ह बँकेने बँका आणि मोठ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना कोरोना संकटामुळे ‘स्ट्रेस टेस्ट’चा सल्ला यापूर्वीच दिला असून, भांडवल उभारणी आणि आपत्कालीन तरलतेची तरतूद यांचे नियोजन करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. अशा तर्हेंचे भांडवल घातले तर गुंतवणूकदारांनाही मोठी रक्कम त्यामधून ठेवण्यास उत्तेजन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय बँकिंग व्यवस्था सुरक्षित आणि भक्कम पायावर उभी आहे; पण त्यांच्या आणि एकूण वित्तीय व्यवस्थेच्या दीर्घकालीन स्थैर्यासाठी त्यांनी आता खोलवर जाऊन आत्मचिंतन केले पाहिजे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, अयोग्य बिझनेस मॉडेल ही बँकेची उणी आणि दुबळी बाजू आहे. प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया एक तर वाईट आहे किंवा त्याचाच अभाव आहे. शिवाय, प्रवर्तक आणि संबंधित बाह्य घटक या घटकांच्या हिताबाबतच्या विचारात ताळमेळ नाही. याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.बँकांनी आपल्या व्यवसायाच्या धोरणांचा पूर्णत: नव्याने फेरविचार करायला हवा.
बँकिंग व्यवस्थेत आणखी सुधारणा करायला हव्यात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकत्रीकरणाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.ते म्हणाले, मोठ्या आणि अधिक कार्यक्षम बँका जागतिक पातळीवरील बँकांशी चांगली स्पर्धा देऊ शकतात. बँकांचा आकार मोठा असणे आवश्यक आहे; पण त्याहीपेक्षा त्या कार्यक्षम असणे ही मोठी गरज आहे.ग्राहकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बँकेतील फसवणुकीचे, घोटाळे टाळण्यासाठी बँकेचे जोखीम व्यवस्थापन अत्याधुनिक आणि अगदी सुरुवातीला त्याचा माग काढता येणारे असावे, असेही त्यांनी सुचविले.