नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली होती . गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्र सरकारने 21 सप्टेंबर पासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.
असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल. शाळांमध्ये कोणतीही अॅक्टीव्हिटी सुरू करण्यापूर्वी यामध्ये वर्ग, प्रयोगशाळा परिसर सॅनिटाइज करावे लागणार आहे.