पाटण : कोयना नदी काठावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध माती उत्खनन व माती वाहतूकीवर प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी शनिवारी कारवाईचा धडाका लावला असून तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना देखील अवैध माती उत्खननावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध माती उत्खनना बाबत वृत्त पत्रातून वृत्त प्रसिद्ध होताच महसूल प्रशासनाने धडक कारवाईला सुरवात केल्याने माती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. या केलेल्या कारवाई बाबत कोयना नदीकाठावरील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.
कोयना नदी काठावर नेरळे ते नावडी या दरम्यान ठिकठिकाणी महसूल प्रशासनाच्या परवानगीने माती उत्खनन सुरू आहे. महसूल प्रशासनाची परवानगी व प्रत्येक्षात झालेले माती उत्खनन यात मोठी तफावत असल्याने याबाबत शनिवारी वृत्त पत्रातून वृत्त प्रसिद्ध झाले असता. खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने अवैध माती उत्खनन व वाहतूकीवर धडक कारवाईला सुरवात केली. या कारवाईत प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी स्वतः लक्ष घालून त्यांनी तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना अवैध माती उत्खनन व वाहतूकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाई बाबत कोयना नदीकाठावरील ग्रामस्थ व शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
कोयना नदीकाठावरील अवैध माती उत्खननामुळे कोयना काठ अक्षरशः पोखरला जात आहे. माती उत्खनन महसूल प्रशासनाच्या परवानगीने सुरु असले तरी प्रत्येक्षात परवानगी त्यावरील अटी, नियम बाजूला सारून नियमबाह्य माती उत्खनन सुरु असल्याचे दिसत आहे. तसेच उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक देखील नियमबाह्य सुरु असल्याने याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या माती उत्खननाने कोयना नदीचे पात्र पसरले गेले असून याचा फटका पावसाळ्यात कोयना नदीला निर्माण होत असलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना बसत आहे. हि बाब वृत्त पत्रातून महसूल प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने अवैध माती उत्खनन व वाहतूकीवर कारवाई करण्यास सुरवात केली.