सातारा दि.1 : कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपीकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान अधारीत फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ मधील अंबिया बहारातील डाळींब, द्राक्ष, केळी व स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश यामध्ये करणेत आला आहे. दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतक-यांना भेट देऊनस्ट्रॉबेरी पीकाबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील शेतक-यांनी स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करणेची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कृषि विभागास दिले होते. कृषि विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश या योजनेत करणेत आला आहे.
या योजनेमध्ये सन २०२०-२१ पासून काही बदल केले असून सदर योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. शेतक-यांनी फक्त ५ टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येईल. शेतक-यांनी ज्या शेतातील अधिसूचित फळपिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा ७/१२ उतारा व खाते उतारा (८ अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरणेची व्यवस्था करणेत आली आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पिक असल्याचा स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे अधिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन करणेत येत आहे. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरणेविषयी तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांनी केलेले आहे.