फलटण प्रतिनिधी : 15 फेब्रुवारी
फलटण तालुक्यातील टंचाई घोषित केलेल्या 43 गावामध्ये पाणी टँकर उपलब्ध केले आहेत. या सर्व गावामध्ये टँकर मधुन प्राप्त होणारे पाणी योग्य पद्धतीने वाटप करावे अशा सूचना फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केल्या. ते फलटण पंचायत समिती येथे टंचाई घोषित केलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, पोलीस पाटील,कृषिसहाय्यक,लाईनमन यांच्या बैठक प्रसंगी बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले की, गावोगावी ग्रामस्तरीय समिती स्थापन कराव्यात ज्यामध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांचा समावेश असावा. त्याच बरोबर वैरण विकास योजना यातून वैरण उत्पादन वाढवावे. तर चारा पिकांची लागवड कराताना जास्त पाण्याची पिके टाळावीत अशा सूचना यावेळी ढोले यांनी केल्या.
पाणी टंचाई घोषित केलेल्या गावांनी प्रत्येक टँकर मधुन प्राप्त होणारे पाणी योग्य पद्धतीने वाटप करताना त्याचे तपशीक व्यवस्थित ठेवावा असे सांगितले. निरा उजव्या कालव्याच्या पुढील अवर्तनात जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या 83 विहिरींचे पाण्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन तयार करण्याचे निर्देश यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले.
आज पाणी व चारा टंचाई आढावा बैठक :
पाणी व चारा टंचाई चे नियोजनाकामी व तालुकास्तरीय व्यवस्थापन समितीची आढावा बैठक आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण येथे होणार आहे. सदर बैठकीस आपले कडील अद्ययावत माहितीसह स्वतः समक्ष उपस्थित रहावे कोणीही प्रतिनिधी पाठवू नयेत अशा सक्त सूचना व्यवस्थापन समितीला प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.