नवारस्ता : पाटण तहसील कार्यालय आवारातील सार्वजनिक शौचालय व मुतारी अनेक दिवसांपासून स्वच्छते अभावी व दुरुस्ती अभावी वापरास अयोग्य झाली असल्याने शासकीय कामकाजाच्या निमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील जनतेला याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तर एकीकडे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्वतंत्र शौचालय असल्याने सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाकडे कोणाचेही लक्ष नाही.
पाटण तहसील कार्यालयाच्या आवारातील सार्वजनिक स्वच्छालय व मुतारी ची दुरुस्ती व स्वच्छता व्हावी या मागणीचे निवेदन पाटण तहसीलदार यांना दि. २९ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाटण तालुका अध्यक्ष विकास हादवे यांनी दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की पाटण तहसील कार्यालयाच्या आवारातील मागील बाजूस असणारे सार्वजनिक शौचालय व मुतारी ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे कोणत्याही प्रकारची स्वच्छता दिसत नाही यामुळे येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तहसील कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना व महिलांना या घाणीच्या साम्राज्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील अधिकारी वर्गाला शौचालयाची व मुतारीची स्वतंत्र व्यवस्था असल्याने तहसील कार्यालयातील सार्वजनीक शौचालयाचे गांभीर्य अधिकारी वर्गात दिसून येत नाही. त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून शौचालय दुरुस्ती व स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे, असे देण्यात आलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटना पाटण तालुका अध्यक्ष विकास महादेव हदवे यांनी म्हटले आहे.