महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : वाठार स्टेशन
जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीने पिकांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना भरपाई द्या, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आ.दिपक चव्हाण यांनी दिले.
वाठार स्टेशन परिसरातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भुईमूग,सोयाबीन बटाटा आदी पिकांच्या पाहणीप्रसंगी आ.दिपक चव्हाण बोलत होते. यावेळी मंडलअधिकारी डोईफोडे, तलाठी नाळे, उपसभापती संजय साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेशशेठ जाधव, तालुका कृषी अधिकारी,मंडल कृषी अधिकारी, वाठार स्टेशनचे सरपंच ऋषीभैय्या जाधव,शेतकरी किसन जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नामदेव जाधव,आदी उपस्थित होते.
आ. दिपक चव्हाण म्हणाले, परतीच्या पडलेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले दिसत आहे. शेतातील पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महसूल व कृषी विभाग यांनी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या. आ.दिपक चव्हाण, व उपसभापती संजय साळुंखे म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या आधाराची गरज आहे. शेती नुकसानीचे पंचनामे करून संबंधित विभागाने अहवाल सादर करावा तसेच संबंधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून आ.दिपक चव्हाण यांनी विविध यंत्रणांकडून याबाबत आढावा घेतला. यावेळी उपसभापती संजय साळुंखे, तालुका कृषी अधिकारी,मंडलाधिकारी डोईफोडे, तलाठी नाळे,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आदी उपस्थित होते.






















