वाई, दि. ४ : येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सुरू होत असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार असून अंतिम निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी सांगितले. वाई एमआयडीसी येथे श्रीनिवास मंगल कार्यालयात सकाळी आठ वाजता सत्याहत्तर टेबलवरती या मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी व १ पर्यवेक्षक अशा चौघांची नेमणूक करण्यात आली आहे.असे सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतमोजणीस सकाळी आठ वाजता जरी सुरुवात होणार असली तरी एक शे चोपन्न मतदान केंद्रांवरील मतपेट्या एकत्रित करणे व इतर कामांमुळे खरी प्रत्यक्षात मत मोजणी आकरा वाजता सुरू होणार आहे. सदर मतमोजणी मतदान केंद्रनिहाय करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी तसेच परिसरामध्ये चौदा सीसीटीव्ही कॅमेरे शासनाच्यावतीने बसविण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी डीवायएसपी शीतल खराडे पाटील, वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे एपीआय अशीष कांबळे, वाईचे ए पी आय रवींद्र तेलतुंबडे, पी एस आय विजय शिर्के, कृष्णराज पवार व सहकार्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. टी. खामकर, एम. के. रुपनवर, जे. पी. शिंदे, प्रिती काळे यांच्यासह ३५० कर्मचारी कार्यरत आहेत.
सत्तारूढ गटाचे मदन भोसले व विरोधी गटाचे आ. मकरंद पाटिल यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने भाजपाचे केंद्रीय मंत्री ना अमित शहा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारुढ गटाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याने या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोचली आहे. जिल्हयासह संपुर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. मतपेटी मध्ये बंद असलेले यांचे भवितव्य आज उघडणार असल्याने मतदारराजा नक्की कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार आहे हे सायंकाळी पाच वाजता चित्र स्पष्ट होईल.