
फलटण प्रतिनिधी दि ९ जानेवारी २०२६
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरवाडी जिल्हा परिषद गट व सस्तेवाडी पंचायत समिती गणामधून महायुती व शिवसेना(राजे गट) या पक्षांतर्गत उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. साखरवाडी जिल्हा परिषद गट हा सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा गट असून २०१२साली या ठिकाणी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात अतिशय चुरशीची सामना झाला होता व या सामन्यानंतरच सातारा जिल्ह्यामध्ये साखरवाडी जिल्हा परिषद गट हा सर्वाधिक चर्चिला गेला आता तब्बल नऊ वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होत असून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर आणि रेखा संदीप शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. यात शिवांजली राजे विजयी ठरल्या होत्या. यावेळी साखरवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती-जमातीसाठी(महिला) राखीव असून महायुतीकडून पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. संचिता सागर कांबळे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
साखरवाडी पंचायत समिती गण ही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या ठिकाणी साखरवाडीचे माजी उपसरपंच अक्षय रुपनवर यांच्या मातोश्री मंगल रुपनवर तसेच माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांची कन्या कु. शिवांजली भोसले यांची नावे चर्चेत आहेत.
सस्तेवाडी पंचायत समिती गण ओबीसी पुरुषांसाठी राखीव असून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जुने खंदे समर्थक संदीप शिंदे (शिंदेवाडी) व विजय भिसे (कांबळेश्वर) हे प्रमुख दावेदार आहेत.
दरम्यान, शिवसेना (राजे गट) एकनाथ शिंदे गट यांच्याकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू असून जिल्हा परिषदेसाठी साखरवाडीतून सौ शितल अशोक सोनवणे, श्रीमती रूपाली सरगर,सौ प्रियांका उमेश कांबळे व सौ उज्वला हरीश गायकवाड ही नावे चर्चेत आहेत.
तर साखरवाडी गणामधून मध्ये माजी सभापती शंकरराव माडकर यांच्या सुविद्य पत्नी सौ कमलताई माडकर दावेदार म्हणून पुढे येत आहेत. तर सस्तेवाडी गणा साठी गणेश तांबे व आनंदराव धायगुडे यांची नावे समोर येत आहेत.आरक्षण, पक्षीय गणिते व स्थानिक समीकरणांमुळे उमेदवारीबाबतची स्पर्धा तीव्र होत असून अधिकृत घोषणा व अंतिम उमेदवारांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अद्याप महायुतीमध्ये फलटण तालुक्यातील जागावाटप निश्चित झाले नसून असे असले तरी फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महायुती विरुद्ध शिवसेना (राजे गट)एकनाथ शिंदे गट यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे महाराष्ट्र न्यूज च्या वाचकांसाठी आजपासून आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर करून त्या ठिकाणचे मागील व सद्यस्थितीचे राजकीय वस्तुस्थिती मांडणार असून आज साखरवाडी या जिल्हा परिषद गटातून त्या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज च्या वाचकांसाठी राजकीय वार्तापत्र सुरू करीत आहोत




















