
श्री गणेश मंदिर भरतगाव वाडीत प्रचाराचा नारळ फुटणार
सातारा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा विचारात न घेतल्याच्या चर्चा आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीत मनोमिलन असले तरी जागावाटपावरुन अंतर्गत मतभेद झाल्याने बंडखोरी उफाळली आणि ९ जागांवर अपक्ष निवडून आले. या निवडणुकीत देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. एका हॉटेलमध्ये झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतून खासदार उदयनराजे भोसले निघून गेल्याने तर्कवितर्क लढविले गेले. यावेळी हव्या त्या जागा न मिळाल्याने उदयनराजे नाराज असल्याचे बोलेल जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांची देहबोली सर्व काही सांगून गेली. याचा प्रत्यय म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपची उमेदवारी डावलल्याने थेट शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज दाखल केला.
शेंद्रे जि.प गटातून पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत (आप्पा) पडवळ यांच्या भावजय उर्मिला शशिकांत पडवळ या शिवसेनेकडून निवडणूक लढवीत आहेत तर मनिषा सदाशिव भोसले या शेंद्रे पंचायत समिती गणातून तर नलिनी किरण पवार या निनाम गणातून शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या आहेत.
हे तिन्ही उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचे विचार मानणारे असून खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या एकजुटीने शेंद्रे गटात विजय संपादन करू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या तिन्ही उमेदवारांना मोठी ताकद मिळाली असून आज या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ संध्याकाळी 4.30 वा श्री गणेश मंदिर भरतगाववाडी येथे फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, तसेच बोरगाव भैरवनाथ मंदिर व भैरवनाथ मंदिर वेचले येथे प्रचार रॅली करणार असून तरी नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















