मायणी प्रतिनिधी
मायणी ता. खटाव येथील पोलीस दूरक्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून जप्त करून पडून असलेल्या दुचाकी वाहनांना अचानक आग लागून त्यात एकूण अकरा दुचाकी वाहने जळून खाक झाली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला.अद्यापी आग लागण्याचे कारण समजले नाही .
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून या संदर्भात मिळालेल्या महिती नुसार मायणी ता. खटाव येथील पोलीस दूरक्षेत्रामध्ये जप्त केलेली काही दुचाकी वाहने अनेक वर्षांपासून पडून होती. पोलीस स्टेशनच्या पाठीमागील बाजूस एकूण 11 दुचाकी होत्या. मंगळवार दि. 13 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक या वाहनांना आग लागली. पोलीस स्टेशनमध्ये धूर येताच तेथील स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी तातडीने सदर ठिकाणी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने पाण्याचा टँकर पाठविला. तसेच परिसरातील नागरिकांनीही आपल्या घरातील पाण्याची भांडी आणून सदर आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केल्याने सुमारे अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. परंतु आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही.
दरम्यान घटनास्थळी वडूचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
मायणी : येथील पोलीस दुरुक्षेत्रात जळून खाक झालेल्या दुचाकी. ( छाया: महेश जाधव)