हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर निलंबित आयएफएस अधिकारी व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याला नागपूर येथून बुधवारी (ता. २८) मध्यरात्री ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता. २९) पहाटे धारणीत पोहोचले. येथील न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, असे पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्देशानुसार त्वरित कोरोना चाचणीकरिता पाठवण्यात आले. त्यानंतर १.३० वाजता परत न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी सात दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने रेड्डींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी तपास अधिकारी पूनम पाटील, ठाणेदार विलास कुलकर्णी, प्रशांत गीते, देवेंद्र ठाकूर, मंगेश भोयर, सचिन होले, अरविंद सरोदे उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्राथमिक चौकशीसाठी आलेल्या अपर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे या बुधवारी (ता. २८) पहाटेच अमरावतीवरून मुंबईकरिता रवाना झाल्या. त्यांना जाऊन २४ तास होत नाही तोच रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाली.
उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी रेड्डीला धारणीत आणल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करून काही बाबींची माहिती घेतली. बयाण नोंदविले. गुन्हा दाखल होऊन अटकेनंतर निलंबित अधिकारी रेड्डींनी नेमकी कोणती माहिती तपास अधिकाऱ्यांपुढे उघड केली, याचा गोषवारा बाहेर येऊ शकला नाही. रेड्डीला चौकशीअंती गुरुवारी (ता. २९) दुपारी धारणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (ता. एक) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.