पाटण प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माजी मंत्री, आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीनुसार पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर सुपूर्द करण्यात आला. आ. शशिकांत शिंदे यांनी केवळ बोलून न दाखवता प्रत्यक्ष करून दाखविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी सत्यजितसिंह पाटणकर हे स्वत: केअर सेंटरमध्ये क्रेनद्वारे जनरेटर उतरून ते चालू करेपर्यंत तळ ठोकून उभे होते. या जनरेटमुळे कोरोना केअर सेंटरमधील विजेची चिंता मिटली आहे.यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, दिलीपराव मोटे, दिनकरराव घाडगे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, नगरसेवक किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.पाटण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विनंतीवरून गेल्या आठवड्यात पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती.
या बैठकीत आ. शिंदे यांनी तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेत जी जी मदत लागेल ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व वैयक्तीक स्वरूपात करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते.या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने याठिकाणी सातत्याने वीज जाण्याचे प्रकार घडत असतात. आता तर तोंडावर पावसाळा असून वीजपुरवठा खंडीत होण्याने बाधित रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा येवून जीवावर बेतू नये. तसेच पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होवू नये यासाठी येथे तातडीने जनरेटर मिळावे, अशी मागणी बैठकीतच आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे केली होती. आ. शिंदे यांनी जनरेटर देण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते.
त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी शब्द पाळत सदरचे जनरेटर पाटण राष्ट्रवादी कार्यालयात पाठविले.गुरूवारी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माजी मंत्री, आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीनुसार पाटण कोरोना केअर सेंटरला जनरेटर सुपूर्द केले.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांनी स्वत: पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये उभे राहून ते चालू करेपर्यंत प्रत्यक्षपणे लक्ष घातले. या जनरेटमुळे कोरोना केअर सेंटरमधील विजेची चिंता मिटली आहे. सध्या पावसाळा तोंडावर आल्याने वीज जरी खंडीत झाली तरी पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये विजेचा पुरवठा सुरळीतपणे होवू शकतो. दरम्यान, नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मागणीला आ. शशिकांत शिंदे यांनी पाठबळ देत जनरेटर उपलब्ध करून दिल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.