महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी : संतोष सुतार
माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभागात कार्यरत असणारे वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय 57 वर्षे रा. ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे गायत्री निवास दहिवडी, मूळ राहणार मार्डी ता. माण) यांना काल दि 2 रोजी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभाग सातारा यांनी ताब्यात घेतले आहे. आज पहाटे दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एसिबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय तक्रारदार हे पोट ठेकेदार म्हणून काम करीत असून, त्यांनी संस्थेच्या नावे मौजे शिंदे खुर्द येथील का.नं.884 माती बंधारा या केलेल्या कामाच्या बिलाचा चेक देण्यासाठी संशयित आरोपी पोळ यांनी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली व ती स्वीकारून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने सदर लाचेची रक्कम ही कुठेतरी अज्ञात ठिकाणी फेकून दिली. त्यानंतर पोळ यांना रंगेहात पकडण्यात आले. नंतर वनपाल पोळ यांना घेऊन सदर ठिकाणी लाचेच्या रकमेचा शोध घेतला असता रक्कम मिळाली नाही. वनपाल पोळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7, व भा द वी कलम 201 अन्वये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के लाच लुचपत प्रतिबंध विभाग सातारा व त्यांच्या पथकाने केली आहे.




















