सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक २१ जून ते १ जुलै या कालावधीमध्ये " कृषी संजीवनी मोहीम " राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभर प्रत्येक दिवशी एका विषयावर शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, शिवार फेरी, इ. च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत दिनांक २५ जून रोजी सोरटेवाडी, होळ येथील आघारकर संशोधन संस्था येथे मंडल कृषी अधिकारी वडगाव निंबाळकर कार्यालयाच्या वतीने " विकेल ते पिकेल " या अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण पीक पद्धतीमध्ये खपली गहू लागवड याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषी आयुक्तालय कार्यालयातील कृषी उपसंचालक ऊर्मिला रजपूत ,नोडल ऑफिसर म्हणून उपस्थित होत्या. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गीते, होळचे सरपंच संतोष होळकर, सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर, उपसरपंच विकास पवार व प्रगतशील शेतकरी श्रीपाल सोरटे इत्यादी शेतकरी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आघारकर संशोधन संस्थेचे डॉक्टर विजेंद्र बावस्कर यांनी खपली गहू लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले व भानुदास इंदोळ यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान तर डॉक्टर सुधीर नवाथे यांनी आगरकर संशोधन संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी तालुक्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या " कृषी संजीवनी मोहिमे " चा उद्देश,नाविन्यपूर्ण योजना, महाडीबीटी इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी "विकेल ते पिकेल" नाविन्यपूर्ण बाबी ,पीक पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.तसेच लागवडीपासून ते काढणीपर्यंत तसेच विक्री व्यवस्थापन यावर शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कृषी उपसंचालक उर्मिला राजपूत यांनी तालुक्यात राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले.कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी करंजेपुल येथील युवा उद्योजक प्राध्यापक प्रशांत राऊत यांच्या संताजी लाकडी तेल घाणा या प्रकल्पास पाहणी केली. तसेच त्यांच्या या उद्योजकाचे त्यांनी कौतुक केले कार्यक्रमास सोरटेवाडी परिसरातील शेतकरी कृषी विभागाचे कर्मचारी व आघारकर संशोधन संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक चंद्रशेखर जगताप यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने यांनी मानले.