तुर्तास बास
मधुसूदन पतकी
सत्ता ताब्यात घ्यायला कोणी तयार नसेल तर ही पाच वर्ष नक्कीच काढली ही जातील त्यात विशेष काही नाही . आणि सध्याची परिस्थिती पाहता कोणताही शहाणा पक्ष सत्तेचे चक्र हातात घेऊन तीचे सारथ्य करेल असे वाटत नाही .पाच वर्षे सत्ता कशी चालवणार हा मुख्य प्रश्न आहे
आनंद या चित्रपटात राजेश खन्ना ,एक सुंदर वाक्य जीवनविषयक तत्वज्ञान म्हणून सांगतो. त्या वाक्याचा अर्थ असा , कंटाळवाण्या दीर्घायुष्या पेक्षा भव्यदिव्य , उदात्त काही करता आल तर ते छोटेखानी आयुष्य असलं तरी खूप सुंदर असते . इथं रॉय किणीकर यांचीही एक रुबाई आठवते .त्यात ते म्हणतात, एखादी व्यक्ती साठ वर्षे जगली असं म्हणण्यापेक्षा ती जर निष्क्रीय, निरडलेली असेल तर त्या व्यक्तीने साठ वर्ष मरण यायला घेतली असे म्हणावे लागेल . हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी महा विकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कालखंड पूर्णपणे सत्तेत राहील . कार्यकाळ पूर्ण करेल . असे वक्तव्य काल केले . पाच वर्ष पूर्णत्वाचा हा राग किंवा आघाडीत बिघाडी नाही हे उडत्या चालीचे गाणे वा सरकारला कोणताही धोका नाही हा ख्याल ही महाआघाडीतील तिन्ही पक्ष्यांची दैनंदिन जबाबदारी , खरंतर गरज ही झाली आहे . पाच वर्ष सत्तेत राहा , शासन चालवा पण ते केवळ चालतंय म्हणून चालवू नका ; तर या काळात जनकल्याणाची कामे करा असे आता सांगावेसे वाटते. सत्तेत पाच वर्ष काढली पण त्या काळात काहीच केलं नाही , करू शकलो नाही हे सांगणं फारसे भूषणावह नाही.
विरोधकांच्या हातात कोलीत
सत्ता ताब्यात घ्यायला कोणी तयार नसेल तर ही पाच वर्ष नक्कीच काढली ही जातील त्यात विशेष काही नाही . आणि सध्याची परिस्थिती पाहता कोणताही शहाणा पक्ष सत्तेचे चक्र हातात घेऊन तीचे सारथ्य करेल असे वाटत नाही . ढासळलेली अर्थव्यवस्था, राज्यात असलेली आरोग्य परिस्थिती राखण्याबाबत असलेली अस्थिरता ,बेरोजगारी , आरक्षण , तसेच कृषी क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा असलेला अभाव , व्यापारी – उद्योजकांचा रोष आणि आहे त्या नोकरदारांचे न सुटणारे प्रश्न या सवालांना समोर जाऊन त्याचे जबाब देणे आणि सगळ्यांना समाधानी करणे शासनाला सध्यातरी अवघड आहे . या परिस्थितीत विरोधी पक्षाला सतारूढ पक्षावर सतत आरोप आणि टीकाटिपणी करून चमकदार कामगिरी करता येईल . याउप्पर सत्तारूढ पक्षाने ओढवून घेतलेल्या वाझे सारख्या प्रकरणामुळे विरोधकांच्या हातात आलेले आयतं कोलीत सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी जे काही कार्य ,कर्तृत्व केले असेल त्याला आग लावण्यासाठी पुरेसे आहे . अशा परिस्थितीत श्री. शरद पवार आम्ही पाच वर्ष पूर्ण करणार असे म्हणत असतील तर त्यांनी ती पूर्ण करावीत . मात्र ती कशी पूर्ण करणार आहेत , हे ही सांगावे . खरेतर आगामी तीन वर्ष कशी पूर्ण करणार हे सांगणे त्यांच्याकडून अपेक्षित . दिल्लीमध्ये जाऊन २०२४ सालामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका हे त्यांचे उद्दिष्ट असेल तर राज्यातील सरकार पाच वर्षे चालणार यापेक्षा कसे चालणार यावरच त्यांची लोकसभेची निवडणूक आणि यशापयश अवलंबून असेल . राज्यात जे सरकार स्थापन केले त्याचे कर्तेधर्ते तेच होते. आहेत. आता ते चालवण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ त्यांचीच आहे . कामाचे , त्यांचेच आहे कसे का होईना महाविकास आघाडी सरकारने पाच वर्ष काढली ही त्यांच्या यशाची व्याख्या असेल अथवा राजकारणाच्या परिप्रेक्षात भाजपला राज्यातील सत्तेपासून पाच वर्ष दूर ठेवले हा त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाचा उच्चतम बिंदु असेल तर त्यांनी ते यश प्राप्त केले असे म्हणावे लागेल.मात्र जनतेच्या दृष्टीने , जनतेच्या हातात या पाच वर्षात रिकामी झोळी नसेल हे पाहणे ही त्यांचे कर्तव्य आहे . वैयक्तिक द्वेष , हेवेदावे , भडास ,खुन्नस काढण्याचे राजकारण आणि पुढे जाऊन सत्ताकारण हे व्यासपीठ नाही . याची जाण राजकीय नेत्यांनी ठेवली पाहिजे .
सुशासन अपेक्षित
खरेतर नाकारलेल्या पक्ष्यांना एकत्र आणून सत्ता स्थापन होऊ शकते आणि नाकारलेल्या मंडळींना एकत्र केल्यावर सत्ता मिळवण्यासाठी बहुमत होऊ शकते, हा लोकशाहीचा आज पर्यंत न समजलेला अर्थ राज्यातील जनतेला श्री. शरद पवार यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केवळ समजूनच दिला नाही तर तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला याबद्दल श्री . शरद पवार यांचे राज्यातील जनता लोकशाहीचे अभ्यासक यांनी आभारच मानले पाहिजेत . मात्र शासनाचे सुशासन करणे, ते जनतेसाठी उपयोगात आणणे हे ही लोकशाहीचे मूलतत्त्व आहे. ती पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे आणि विश्वासाने त्यांनी केले पाहिजेत .
ज्या पक्षाचा राज्याचा गृहमंत्री पोलिसांना पैसे जमा किंवा गोळा करण्याचे उद्दिष्ट देतो. त्यात त्याला राजीनामा द्यावा . एका मंत्र्यावर मुलीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप . आणि मंत्रिपद गमवावे लागते . किंवा एका मंत्र्याची दोन-तीन लग्न होतात मात्र समजूतदारपणे प्रकरण निकाली काढले . अथवा आघाडीत अनेक मंत्री घोटाळेबाज असल्याचा आरोप दर दिवशी होतो . या संदर्भामध्ये श्री. शरद पवार यांनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. हे प्रकार कसे थांबवता येतील याची कृतिशील अंमलबजावणी केली पाहिजे. पंधराहून अधिक पक्षातील मंडळींना एकत्र करून मोदी सरकार विरोधात शड्डू ठोकणे हे सहज आहे . मात्र आपल्याच महाविकास
आघाडीतल्या मंत्र्यांची नेत्यांची तोंडे एका दिशेला ठेवणे कौशल्याचे काम आहे त्याच बरोबर मंत्र्यांना शिस्त लावणे आणि शिस्तच नव्हे तर लोभ ,माया ,लोभ यापासून दूर ठेवण्यासाठी नैतिकतेची शिकवण देणे ही गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोप होत राहतात . दोषी, निर्दोषी न्यायालय ठरविते मात्र जनतेच्या दरबारात शासन करते व त्यांचे चारित्र्य चेष्टेचा विषय होऊ नये . कोविड सारख्या जागतिक संकटात राज्य स्थिरस्थावर कसे होईल याकडेच जास्त लक्ष देण्याबाबत श्री. शरद पवार यांनी आता कष्ट घेतले पाहिजेत एवढेच .
तुर्तास बास..!