महाराष्ट्र न्यूज /सातारा : शुक्रवारी झालेल्या सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या पाणीपुरवठा विभागा साठी कोट्यावधी रुपयांच्या निधीला एकमुखी मंजुरी मिळाल्याने सातारकरांसाठी आजचा दिवस सोनियाचा ठरला आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असला तरी यापुढे ही आपण सातारकरांच्या ऋणातच राहणार असल्याची भावना पाणीपुरवठा विभागाच्या सभापती सौ.सीता राम हादगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ११ जानेवारी २०२१ रोजी मी पाणी पुरवठा विभागाच्या सभापती पदाचा कार्यभार हाती घेतला. दुर्दैवाने मार्च २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात कोरोनाने फार मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला. त्याचा गेल्या दोन वर्षात सातारच्या विकासकामांवर फार मोठा परिणाम झाला असला तरी या कालावधीत सातारकरांच्या समस्या काय आहेत? मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून कोणती कामे प्राधान्याने हाती घेतली पाहिजेत? याचा सविस्तर अभ्यास करून आमचे नेते खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद ॲड.डी.जी.बनकर यांच्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये खास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सांबरवाडी फिल्टरेशन प्लांटमध्ये फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामासाठी ७५ लाख, युआयडीएसएस एमटी योजनेमधील डोंगर मार्गातील अपूर्ण राहिलेल्या पावर हाउस ते माची पेठ अखेर नवीन गुरुत्व नलिका, वितरण नलिका टाकण्यासह माची पेठ-नागझरी टाक्यांची वितरण नलिका टाकण्याच्या कामासाठी १ कोटी ३७ लाख, शहापुर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जकातवाडी फिल्टरेशन प्लांटमधील फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामासाठी ७५ लाख रुपये कामांना एक एकमुखाने मंजुरी मिळाली आहे.
सातारा शहर परिसरातील पेठ करंजे लगतच्या बसप्पा पेठ, शिंदे मळा, भोसले नगर, शेलारवस्ती या भागाला सातारा तालुका पोलीस स्टेशन लगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. या परिसरात ८ ते १० हजारांवर लोकवस्ती आहे. १० लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काही निधी मंजूर झाला आहे. टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने पुढील कार्यवाही करता आली नाही. मात्र सद्य परिस्थितीत जागा उपलब्ध झाली असल्याने या कामासाठी ९९ लाख ६३ हजार ०८९ कृपया खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. शहापूर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहापूर पंप हाऊसमध्ये २१५ एचपी पंप बसवणे व इतर कामासाठी २४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी सोलरची मदत घेणार
शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे बिल प्रति महिना २५ लाख रुपये एवढे येत आहे. इतकी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटत नसल्याने या योजनेसाठी सोलरची मदत घ्यावी, अशी आपण मागणी केली असून त्यासाठी शासनाने निधीची तरतूद करावी. सोलरसाठी निधी उपलब्ध करून दिला तर वीज बिलापोटी भराव्या लागणारी रक्कम वाचण्यास मदत होणार आहे. वाचलेली रक्कम इतर विकास कामासाठी वापरण्यात आल्यास ते सातारकरांची साठी हिताचे ठरेल असेही सीता हादगे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.