समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा निर्मुलनासाठी कराड नगरपरिषदेचा पुढाकार
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : आज 21 व्या शतकात वावरत असताना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूञ तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यांनंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे.
सबब या प्रथेचे पालन करणे अनुचित असून समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबत, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, दिनांक: 17 मे 2022 रोजीचा शासन निर्णय व ग्रामपंचायत हेरवाड जि. कोल्हापूर यांनी दिनांक 05.05.2022 रोजी मंजूर केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच समाजात याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी कृतीशील कार्यवाही व्हावी यासाठी ठराव करून कराड नगरपरिषदेने पुढाकार घेतलेला आहे.

महिलांना कुटूंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर तऱ्हेने होणारे त्रास तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांना सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशनासाठी शहरातील महिलांनी कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या “कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्र, कराड” सौ. दिपाली दिवटे मो. 7499992066, श्री. प्रमोद जगदाळे 9673964590 यांच्याशी संपर्क साधावा.
महिला सन्मानासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा व समाजातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आपली नोंदणी महिला व बालकल्याण विभागात करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन मा. मुख्याधिकारी श्री. रमाकांत डाके यांनी केले आहे.






















