सातारा : ज्या नागरिकांना करोनाची बाधा झाली परंतु आता ते मुक्त झाले आहेत अशा नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.प्लाझ्मा चा उपयोग नव्या रुग्णांना बरे होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होतो.या पार्श्वभूमीवर हे आवाहन भागवत यांनी केले आहे.
पत्रकात माहिती देताना पुढे म्हटले आहे की ज्या रुग्णांना बरे होऊन 28 दिवस झाले आहेत त्यांनी आपल्या शरीरातील प्लाझ्मा अवश्य दान करावा आणि देशभक्ती मध्ये वाटा उचलावा त्यासाठी या रोगांना बरे झाल्यानंतर 28 दिवस पूर्ण झालेले असले पाहिजेत.इच्छुक रुग्णांची ने-आण करण्याची व्यवस्था केली जाईल . दान केल्यानंतर दात्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत नाही.सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ही प्रक्रिया केली जाईल.इच्छुक दात्याची नाष्टा जेवण यांचीही मोफत सोय केली जाईल .रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर प्रतिकारक्षमता वाढते व भरपूर प्रमाणात एंटीबॉडी तयार होतात.या नव्या रुग्णांमध्ये रोपण केल्यानंतर तो रुग्ण बरे होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते.
इच्छुक दात्याने आपल्या भागातील लगतच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.हे मोठे देश कार्य असून या संधीचा फायदा घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे देखील पत्रकात पुढे म्हटले आहे.अधिक माहिती आणि शंका निरसनासाठी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथील डॉक्टर पद्माकर कदम 98 22 63 71 76 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे