नवारस्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी नव्हे तर उत्तूंग व विद्वत्तापूर्ण भारत निर्माण करण्यात खर्ची घातले. डॉ. बाबासाहेबांचे विचार हे जगासाठी प्रेरणादायक आहेत, असे मत अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत फडणीस यांनी व्यक्त केले.
पाटण येथे बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये सामाजिक शास्त्र विभाग यांच्या तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन कार्यक्रम मध्ये ते बोलत होते. सुरुवातीला प्रा.आर. जी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ग्रंथपाल अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करताना हाती शस्त्र न घेता, ज्ञानसंपन्न होवून संघर्ष त्यांनी केला. माझ्या समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्ञानसंपदेचा उपयोग केला. बाबासाहेबांना वाचून चालणार नाही तर त्यांना जाणले पाहिजे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी समाजाला मिळवून दिला. बाबासाहेबांनी गौतम बुध्दांच्या जीवनाचा, चरित्राचा अभ्यास करून त्यांनी स्वातंत्र, समानता, बंधूता हे तत्वज्ञान स्विकारणारा मानवतादवादी बौध्द धर्म स्विकारला.
डॉ. फडणीस आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या जीवनात प्रवर्तन करणारा महापुरूष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांनी कोणत्या धर्माला विरोध केला नाही. पददलितांना, पिढीतांना जगण्याचा मार्ग दाखविला. माझा समाज शिक्षणातून ज्ञानसंपन्न व्हावा यासाठी बाबासाहेबांनी अथक नि अविश्रांत परिश्रम घेतले. त्यामुळे अनेक वंचित, पिढीतांचा शिक्षणाने विकास झाला.
प्रा.संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रा.डॉ.पांडुरंग ऐवळे, प्रा. विनायक राऊत, प्रा.डॉ.व्ही.बी.कुरणे, डॉ.सुमित यादव, डॉ.सौ.एच.व्ही.काटे. प्रा.विजय पानस्कर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.






















