कन्नूर : कन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या भारतीय हवाई दलाने अधिकृत वीटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूर दरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात रावत यांच्या पत्नीचंही निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ व्यक्तींचे निधन झाल्याचे समोर आले आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारतीय वायुदलाकडून देण्यात आली आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बिपिन रावत यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.