कराड : तालुक्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोवारे गावास जोडणारे रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत गोवारे ग्रामस्थांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान सभेच्या निवडणूकांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज दि. 8 डिसेंबर रोजी प्रातांधिकारी आणि तहसिलदार कार्यालयाला देण्यात आले. नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्विकारले.
निवेदनात म्हटले आहे की, गोवारे हे गाव कराड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघात येते. कृष्णा कालव्या लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणासाठी गोवारे, चौडेश्वरी नगर, हनुमान नगर, गजानन सोसायटी येथील रहिवाशी याचा वापर करतात. टेंभू, सयापूर आदी गावातील रहिवाशी या रस्त्यावरून ये-जा करतात. सध्या या रस्त्याची अवस्था भयानक आहे. गोवारेकर मरणयातना भोगत आहेत. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना तारेवरची कसरत करावी लागते.
गोवारे ग्रामस्थांमधून विद्यमान लोकप्रतिनीधी यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे. गेली 8 वर्षे झाले, या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. परंतु आता रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता हेच समजत नाही. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. काहीजणांना आपल्या प्राणांना मुखावे लागले. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत गोवारे ग्रामस्थांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान सभेच्या निवडणूकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच वैभव बोराटे म्हणाले, जोपर्यंत कृष्णा कॅनाल ते हनुमान नगर रस्ता डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत आमचा बहिष्कार राहील.
साजिद मुल्ला म्हणाले, आमच्या गावाला गेली 8 वर्षे रस्त्याचे काम केले नाही. गोवारे गावाने 750 मतांचे लीट विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. मात्र विजयी झाल्यानंतर एकादही पृथ्वीराज चव्हाण आलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांवर आमचा बहिष्कार असणार आहे.