पाटण : पाटण नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 3, 8, 10 व 13 या चार प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 18 रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण सरासरी 76.48 टक्के एवढे मतदान झाले. पाटण शहरातील मतदारांनी मतदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकूण 2 हजार 338 मतदारांपैकी 911 पुरूष व 877 महिला मतदारांनी अशा एकूण 1 हजार 788 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती कराडचे प्रभारी निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.
दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर तसेच पाटण शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रियेस शहरातील नागरीकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
मंगळवार दि. 18 रोजी सकाळी 7.30 वाजल्यानंतर पाटण शहरातील 4 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. सकाळची वेळ आणि थंडीचे दिवस असल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी मंद प्रतिसाद दिला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत युवकांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. सकाळी 12 वाजल्यानंतर मतदार घरातून बाहेर पडू लागले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत बऱ्यापैकी मतदान झाले होते. त्यामुळे सर्वच केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
निवडणूक लागलेल्या 4 प्रभागांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मतदान केले. एकूण चार प्रभागांवर झालेले मतदान पुढील प्रमाणे, प्रभाग क्र. 3 मध्ये 637 पैकी एकूण 508 (79.43 टक्के) मतदान झाले. प्रभाग क्र. 8 मध्ये 812 पैकी 602 (74.14 टक्के), प्रभाग क्र. 10 मध्ये 304 पैकी 244 (80.26 टक्के), प्रभाग क्र.13 मध्ये 585 पैकी 436 (74.53 टक्के) एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाटण नगरपंचायतीच्या एकूण 2 हजार 338 मतदारांपैकी 1 हजार 788 मतदारांनी मतदान केले. सरासरी 76.48 टक्के मतदान झाले. यामध्ये 911 पुरूष तर 877 महिला मतदारांचा समावेश आहे.
पाटण शहरातील अति संवेदनशील असणाऱ्या मतदान केंद्रांवरही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पाटण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, बुधवार दि. 19 जानेवारी 2022 रोजी बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये मतमोजणी होणार असून याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागून रहिले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पाटण शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
व्हिलचेअरअभावी अंपगांचे हाल
पाटणमधील यापूर्वी 13 प्रभागांसाठी व आता 4 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेदरम्यान निवडणूक प्रशासनाकडून एकाही केंद्रावर अपंग व्यक्तींसाठी व्हिलचेअरची सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे अपंग व्यक्तींना स्वत:ची व्हिलचेअर गाडीत टाकून केंद्रावर येवून मतदान करावे लागले. काहींना व्हिलचेअर न मिळाल्याने कार्यकर्त्यांना उचलून केंद्रापर्यंत न्यावे लागले. शासनाने अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक केंद्रावर रॅम्प व व्हिलचेअरची सोय करून देणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने अपंग व्यक्तींना त्रास सहन करावा लागला याची शासनाने गंभीर दखल घ्यावी.
संदीप घाडगे
दिव्यांग मार्गदर्शक, पाटण